
जावयाच्या प्रेमात पडलेल्या सासूने आपल्या नवऱ्याचा काटा काढल्याची घटना बिहार येथील वैशाली येथे घडली आहे. भीषण म्हणजे यानंतर ही आत्महत्या असावी असं भासवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, एका नातेवाईकानेच तिच्याविरुद्ध तक्रार दिल्याने तिचं भांडं फुटलं.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, वैशाली येथील मुरौवतपूर गावात शुक्रवारी पहाटे 50 वर्षांच्या तिलक राय नावाच्या व्यक्तिचा मृतदेह घराच्या छतावर लटकलेला पाहिला. तो पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आलं. तिलक यांच्या देहावर जखमा दिसून येत होत्या. त्यामुळे पोलिसांना आधीच संशय आला होता. त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली, तेव्हा तिलक यांना दारूचं व्यसन होतं आणि ते आपल्या पत्नीला मारहाण करत. गुरुवारी रात्रीही त्यांनी दारू पिऊन बायकोला मारहाण केली आणि घरातून निघून गेले, असा जबाब तिलक यांच्या पत्नीने आणि अल्पवयीन मुलाने दिला होता.
मात्र, या प्रकरणी तिलक यांच्या भावाने त्यांची पत्नी सविता, मुलगा आणि जावई यांच्यावर संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली. त्यामुळे पोलिसांनी या तिघांनाही कसून चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान तिलक यांच्या मुलाने त्यांची हत्या झाल्याचं आणि ते कारस्थान आपल्या आई आणि बहिणीच्या पतीने केल्याचं कबूल केलं. तिलक यांची पत्नी सविता हिचे त्यांचा जावई मोहन राय याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे मूळचा समस्तीपूर इथला मोहन राय लग्नानंतर आपल्या सासुरवाडीला येऊन राहत होता.
या संबंधांची कुणकुण तिलक यांना लागली होती. त्यांनी या संबंधांना विरोधही केला होता. त्यानंतर सविता आणि मोहन यांनी कट रचून तिलक यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिलक यांचा मृत्यू झाला. मृत्युनंतर ती आत्महत्या भासावी म्हणून त्यांनी मृतदेह घरच्या छताला टांगला. मात्र, तिलक यांच्या भावाला संशय आल्याने ही हत्या उघड झाली. दरम्यान, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
























































