तरुणावर भरदिवसा तलवार हल्ला; आई हल्लेखोरांना भिडल्याने वाचले प्राण

पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जयसिंगपुरातील नांदणी नाका रस्त्यावर तरुणावर तलवार हल्ला झाल्याची घटना घडली. पाठीवर वार झाल्याने हा तरुण जखमी झाला. त्याचवेळी त्याच्या आईने हल्लेखोरांवर दगडफेक केल्याने ते पसार झाले. पोटच्या मुलासाठी आई एखाद्या रणरागिणीसारखी हल्लेखोरांना भिडल्याने मुलाचे प्राण वाचले.

सुनील लमाणी या तरुणावर विनोद पवार, अरविंद पवार, विनोद जाधव या तिघांनी तलवारीने हल्ला केला.  ही घटना सीसीटीव्ही पॅमेऱ्यात पैद झाली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील लमाणी यांचे वडील लघुशंकेसाठी गेले होते. सुनील आणि त्याची आई त्यांची वाट पाहत रस्त्यावर उभे होते. त्याचवेळी तिघे मोटारसायकलवरून आले आणि त्यांच्यापैकी विनोद पवार याने सुनीलला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुनीलवर तलवारीने वार केला. पाठीवर वार झाल्याने सुनील जखमी झाला. त्यानंतर प्रतिकार करत सुनील आणि त्याच्या आईने तिघांवर दगडफेक केल्यानंतर संशयित पसार झाले.