भयंकर! विवाहितेला सिगारेटचे चटके देत सामूहिक बलात्कार, विष पाजून फेकले रस्त्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. एका विवाहितेवर तिच्या दोन वर्षांच्या चिमुरडीसमोर दोन नराधमांनी सिगारेटचे चटके देत सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला ठार मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने विष पाजले आणि तिला रस्त्यावर फेकून दिले. महिलेची प्रकृति गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी पीडित महिलेच्या पूर्वाश्रमीच्या पतीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

महिन्याभरापूर्वीच पीडित महिलेचा घटस्फोट झाला होता. पहिल्या पतीपासून तिला दोन वर्षांची मुलगीही आहे. त्यानंतर तिने दुसरे लग्न केले. याचाच राग पतीच्या डोक्यात होता. यातूनच त्याने तिला व तिच्या दुसऱ्या पतीला मारहाण केली. त्यानंतर पीडितेने पोलिसात तक्रार केली. त्यात ती मुख्य साक्षीदार होती. त्यामुळे आरोपी तिच्यावर साक्ष बदलण्यासाठी दबाव आणत होते. पण तिने त्याकडे दु्र्लक्ष केले. त्यातूनच तिला अद्दल घडवण्याचा निर्णय आरोपींनी घेतला.

सोमवारी सदर महिला मुलीबरोबर टेलरकडे जात असताना तिच्या पूर्वपतीने, बहिण, मेव्हणा व भाच्यांच्या मदतीने दोघींचे अपहरण केले. त्यानंतर तिला शेतात घेऊन गेले. तिथे सगळेजण दारू प्यायले. त्यानंतर महिलेला सिगारेटचे चटके देत तिच्या मुलीसमोरच लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिला जबरदस्तीने विषारी कीटकनाशक पाजले व रस्त्यावर फेकले. गावकऱ्यांचे लक्ष पीडितेवर गेले. नंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना दिलेल्या जबानीत महिलेने आरोपींची नावे सांगितली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.