कमलनाथ सरकारचा निर्णय बदलणे भाजपच्या अंगाशी, 7 महापालिका हातातून निसटल्या; काँग्रेसची भरारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच पार पडलेल्या 16 महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजपने सर्वाधिक महानगरपालिका जिंकल्या असल्या तरी त्यांच्या हातातून 7 नगरपालिका निसटल्या आहेत. 16 पैकी 9 महानगरपालिकांमध्ये भाजपचा महापौर विराजमान झाला असून 5 ठिकाणई काँग्रेस, 1 आम आदमी पार्टीने आणि 1 अपक्ष महापौर बनले आहेत.

निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या ताब्यामध्ये 16 पैकी एकही महानगरपालिका नव्हती. मात्र कमलनाथ सरकारचा निर्णय बदलत शिवराज सरकारने थेट जनतेमधून महापौर निवडणूक घेण्याचे ठरवले आणि हा निर्णयच भाजपच्या अंगलट आला. जर भाजपने हा निर्णय बदलला नसता तर 16 पैकी किमान 15 ठिकाणी भाजपचा महापौर विराजमान झाला असता.

भारतीय जनता पक्षाच्या हातातून रिवा, कटनी, मुरैना, छिंदवाडा, ग्वालेर, सिंगरौली, जबलपूर महानगरपालिका गेली आहे. 16 पैकी 7 महानगरपालिका भाजपच्या हातातून निसटल्या असून 2 महानगरपालिका काठावर मिळाल्या आहेत.

1999 नंतर पहिल्यांदाच रिवा काँग्रेसच्या हातात

1999 मधील थेट निवडणुकीनंतर पहिल्यांदाच रिवा येथे काँग्रेसचा महापौर विराजमान झाला आहे. तर मुरैना येथेही काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. येथे काँग्रेसच्या शारदा सोलंकी यांनी भाजप उमेदवाराचा 14 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचा गढ मानला जातो. या मतदारसंघातूनच ते खासदार म्हणून निवडून आले. परंतु आता मुरैना महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

कमलनाथ यांचा निर्णय बदलला

2020 मध्ये सत्तेत आल्यावर शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने कमलनाथ सरकारचा निर्णय बदलत थेट जनतेतून महापौर, अध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला. मात्र याचा फटका त्यांना बसला. 2015-16 मध्ये ज्या 16 महानगरपालिका भाजपने जिंकल्या होत्या त्यापैकी 7 महानगरपालिका त्यांना गमवाव्या लागल्या. काँग्रेसने मात्र शून्यापासून 5 पर्यंत मजल मारत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंड थोपटले आहेत.