
सामना प्रतिनिधी । मुंबई
कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यापूर्वीच मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्रशासन आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने अनेक पादचारी पूल बंद केले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पूल बंद केले असले तरी नागरिकांना त्वरित पर्यायी व्यवस्था करा, अशा सूचना शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी संबंधित अधिकाऱयांना दिल्या.
वडाळा पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील दोन पादचारी पूल रेल्वे आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने धोकादायक ठरवून गेल्या चार महिन्यांपासून बंद केले असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. खासदार शेवाळे यांनी संबंधित अधिकाऱयांसमवेत या पुलांची पाहणी केली. यातील एका पादचारी पुलाचे संरचनात्मक परीक्षण त्वरित करून तो खुला करण्याची मागणी केली आहे. किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाच्या बाहेरील पादचारी पूल बंद असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी नजीकच्या माटुंगा पुलाखाली व्यवस्था करावी, दादर रेल्वे स्थानकावरील फुल मार्केट पुलावर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता या पुलाचे रुंदीकरण करावे अशी मागणीही खासदार शेवाळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. याप्रसंगी विभागप्रमुख मंगेश सातमकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.


























































