
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध सीएसकेला पराभव सहन करावा लागल्यानंतर आरोपी तरुणाने सोशल मीडियावर धमकी दिली होती. यानंतर गुजरात पोलिसांनी सायबर क्राईम कायद्यांतर्गत तरुणाला अटक केली आणि लवकरच त्याला रांची पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल.
केकेआर विरुद्ध चेन्नईच्या संघाने हातातील सामना गमावला होता. यानंतर धोनीची पत्नी साक्षी हिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 5 वर्षीय मुलगी झिवा हिच्यावर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला होता. अखेर गुजरात पोलिसांनी आरोपीचा शोध घेत कच्छ जिल्ह्यातील एका गावातून अटक केली. अटक केलेला आरोपी अल्पवयीन असून तो 12 वी मध्ये शिकत असल्याचे समोर आले आहे.





























































