
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात निवृत्ती घेतली. मात्र निवृत्तीनंतरही त्याची क्रेझ कायम असून चाहत्यांच्या मनावर आजही तो राज्य करताना दिसतोय. धोनीची भेट घेण्यासाठी हरयाणामधील एक चाहता तब्बल 1400 किलोमीटर चालत रांचीला पोहोचला आहे. ‘टेलिग्राफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, हरयाणातील एका गावातील राहणारा अजय गिल नावाचा व्यक्ती धोनीची भेट घेण्यासाठी चालत रांचीला पोहोचला आहे. 29 जुलै रोजी तो घरातून निघाला होता आणि 16 दिवसात 1400 किलोमीटर चालत तो रांचीला आला. धोनीची भेट घेतल्यानंतरच पुन्हा घरी परतणार आहे, असे या 18 वर्षीय चाहत्याने म्हटले. मी एवढ्या लांबून चालत आलो असून मला भेटण्यासाठी धोनीने किमान 10 मिनिटांचा तरी वेळ द्यावा, असे अजय गिलने म्हटले.
दरम्यान, धोनीचा चाहता रांचीला पोहोचला असला तरी धोनी मात्र शुक्रवारी आयपीएलचे उर्वरित सत्र खेळण्यासाठी दुबईला रवाना झाला आहे. धोनी आता तीन महिन्यानंतर रांचीला येईल असे त्याच्या चाहत्याला सांगितले तरीही तो घरी परतण्यासाठी तयार नाही. धोनी परत येईपर्यंत येथेच त्याची वाट पाहत उभा राहील असे अजयने म्हटले.
INDvsENG बाद झाल्यानंतर अँडरसन आणि बुमराहमध्ये बाचाबाची, व्हिडीओ व्हायरल
कोण आहे हा चाहता?
धोनीचा हा चाहता हरयाणातील एका गावात राहतो आणि तिथे तो एका सलूनमध्ये काम करतो. धोनीचा हा चाहता आपल्या लूकमुळेही चर्चेत असून पिवळ्या, नारंगी आणि लाईट ब्ल्यू रंगात त्याने आपले केस रंगवलेले आहेत. तसेच केसांमध्ये ‘धोनी’ आणि ‘माही’ असे नावही कोरलेले आहे. धोनीला भेटण्यासाठी पायी चाललो असल्याचे मी सोनीपत येथील एका सलून चालकाला सांगितले तेव्हा त्याने ही हेअरस्टाईल बनवून दिल्याचे अजयने सांगितले.





























































