एसटीत येणार २५० ब्रेकडाऊन दुरुस्ती गाड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

एसटी महामंडळाच्या गाडय़ा मध्येच नादुरुस्त झाल्यास त्यांची वेळेत दुरुस्ती करण्यासाठी महामंडळाने आपल्या ताफ्यात तब्बल २५० ब्रेकडाऊन दुरुस्ती गाडय़ा समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी पहिली ब्रेकडाऊन दुरुस्ती गाडी ठाणे डेपोत आली असून तिच्या विविध चाचण्या सुरू आहेत. प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून त्या गाडीत नेमके काय काय बदल हवे आहेत याची चाचपणी केली जात असून त्यानुसार पुढील गाडय़ांमध्ये बदल केले जाणार आहेत.

महामंडळाच्या ताफ्यात सुमारे १८ हजार गाड्या आहेत. एखादी गाडी वाटेत बिघडल्यास तिची दुरुस्ती करण्यासाठी एसटीची दुसरी गाडी यांत्रिकी किभागातील दोन कर्मचाऱ्यांना घेऊन तिथपर्यंत जाते आणि तिची दुरुस्ती केली जाते. जर दुरुस्तीचे काम मोठे असेल तर ती नादुरुस्त बस नजीकच्या डेपोत आणून दुरुस्त केली जाते. त्यामुळे एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात अडीचशे ब्रेकडाऊन दुरुस्ती वाहन सामील करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी पहिली ब्रेकडाऊन गाडी ठाणे डेपोत आली असून तिच्या विविध चाचण्या सुरू आहेत.

टाटा कंपनीची ब्रेकडाऊन व्हॅन
टाटा कंपनीने या गाडय़ांचे डिझाइन केले आहे. टायर पंक्चर ते गाडय़ा टोईंग करण्यापर्यत सर्व सोय या गाडय़ांमध्ये असणार आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे, दोन बॅरेल डिझेलदेखील या गाडय़ांमध्ये ठेवण्यात येणार आहे. घाट सेक्शन, महामार्गावर अप आणि डाऊन दोन्ही दिशेला या गाडय़ा ठेवण्यात येणार आहेत. एसटीचे राज्यात २५०डेपो आहेत, त्या प्रत्येकाला एक गाडी देण्यात येणार आहे. येत्या २ महिन्यांत या गाडय़ा महामंडळाच्या ताफ्यात सामील होणार आहेत. त्यामुळे महामंडळाच्या वाटेत बंद पडलेल्या गाडय़ा वेळेत दुरुस्त करणे शक्य होणार आहे.