
पावसाने आज उसंत घेतल्याने पूरस्थितीचा धोका टळला किंवा पूर ओसरला असला तरी नदीकाठच्या गावांमध्ये जे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यातून सुटका कशी करायची याचे ग्रामस्थांना टेन्शन आले आहे.
पश्चिम महाराष्ट्र, कोकणसह नाशिक, संभाजीनगर, विदर्भात गेले तीन-चार दिवस धो-धो कोसळलेल्या पावसाने नद्यांना पूर आला. आज पावसाने दिवसभर उसंत घेतली. पूर ओसरला असला तरी घरादारात चिखलच चिखल पसरला आहे. तो हटविण्यासाठी आता मेहनत करावी लागेल. शिवाय साथीचे रोग पसरण्याचे टेन्शन आहे.
माथेरानमध्ये सर्वाधिक पाऊस
माथेरानमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 354 मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. आजवर झालेली ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे. माथेरानमध्ये दरवर्षी पावसाळय़ाच्या चार महिन्यांत 200 इंच पाऊस पडतो.
राज्यात आतापर्यंत 102 पाऊसबळी गेले असून 3873 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
गडचिरोलीत पावसाचा जोर अजूनही कायम असून
45 गावांतील 11 हजार ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.
























































