सोलर कृषी पंप योजना तब्बल वर्षभरापासून बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यातील शेतकरी सध्या शासनाच्या सोलर कृषी पंप योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच शेतातील पिकांची पाण्याची तहान वाढली आहे. जवळपास सर्व शेतकऱयांकडे सध्यातरी बऱयापैकी पाणी उपलब्ध आहे; पण विजेच्या समस्येने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी विभागाअंतर्गत ‘आपले सरकार महाडीबीटी’ ऑनलाइनद्वारे अर्ज स्वीकारण्यात येत होते. मात्र, जिह्यात मागील एक वर्षापासून ही योजना बंद आहे.

राज्यातील 16 जिल्हे सोलर कृषी पंप योजनेपासून दूर असल्याचे दिसून येत आहे. नगर जिह्यात विशिष्ट प्रवर्गातील जाती वगळता, ही योजना बंद आहे. विशिष्ट प्रवर्गासाठी सुरू असले, तरी हे संकेतस्थळ कायमस्वरूपी लोडवर असते. मागेल त्याला सौरऊर्जा प्राप्त करून दिली जाईल, असे सरकारकडून सांगण्यात येत असले, तरीही या योजनेचा फायदा शेतकऱयांना कितपत झाला? हा प्रश्नही आहे.

‘मुख्यमंत्री सोलर पंप योजना’, ‘कुसुम सोलर योजना’, ‘महाडीबीटी सोलर पंप योजना’ अशा तीन वेगवेगळ्या नावांनी योजना सुरू असल्या, तरी राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने एकच योजना आहे. या तिन्ही योजनांत राज्य व केंद्र सरकारचा सहभाग आहे. राज्य व केंद्र सरकारच्या वतीने ही सर्व योजना 90 टक्के अनुदानित तत्त्वावर सुरू आहे. मागील वर्षात जिह्यातील अनेक शेतकऱयांनी या योजनेत सहभाग नोंदविला होता. आता त्याआधारे त्यातील अनेक शेतकऱयांना अनुदानित तत्त्वावर कृषी सोलर पंप मिळाले आहेत व काही त्या प्रणालीत आहेत. महावितरणने ही योजना जिह्यासाठी त्वरित सुरू करावी, अशी मागणी सध्या शेतकरी करीत आहेत.

3 अश्वशक्तीच्या सोलर पंपाची मूळ किंमत एक लाख 93 हजार 803 रुपये आहे. 90 टक्के अनुदान वगळता, शेतकऱयांना फक्त 19 हजार 380 रुपये भरावे लागतात. जवळपास पावणेतीन लाख रुपये मूळ किमतीच्या पंपासाठी अनुदान वगळता, शेतकऱयांना 26 हजार 975 रुपये भरावे लागतात, तर साडेसात अश्वशक्तीच्या जवळपास पावणेचार लाख रुपये किमतीच्या पंपासाठी अनुदान वगळता, अवघे 37 हजार 440 रुपये भरावे लागतात.