‘मल्टिफ्लेक्स’मध्ये सुरू केलं कोविड हॉस्पिटल, रुग्णांचे हाल पाहवत नसल्याने युवा उद्योजकाचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्यात दररोज शेकडो कोविड रुग्ण आढळून येत आहे. यात प्रामुख्याने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक व लक्षणीय आहे. कोरोनाग्रस्तांच्या या वाढत्या संख्येमुळे सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत असून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी रुग्णालयांची व बेडची कमतरता भासत असल्याने उपचाराअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही विदारक परिस्थिती पाहून धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी माणुसकी जपत स्वतःच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये स्वखर्चाने कोविड हॉस्पिटल उभारले आहे. या हॉस्पिटलमध्ये 50 रुग्णांना ॲक्सिजनसह सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात कोरोनामुळे स्थिती गंभीर बनली आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने अनेक रुग्णांना ऑक्सिजनचे हॅास्पिटल उपलब्ध होत नसल्याने दगावत आहेत. त्यामुळे अभिजीत पाटील यांनी त्यांच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये कोविड हॉस्पिटल उभारुन समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

अभिजीत पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी रुग्णालयांची ऑक्सिजन कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिल्या पायलट ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची घोषणा केली. त्यासोबतच त्यांनी कोविड हॉस्पिटलची निर्मिती करून हजारो गोरगरीब लोकांना अशा अडचणीच्या काळात मोठा आधार दिला आहे.

आम्हाला बेड मिळेल का? म्हणून दररोज अनेकजण भेटायला येतात तसेच अनेकांचे कॉल येतात. सोलापूर जिल्हा व जिल्हा बाहेरील हॉस्पिटलांशी संपर्क करून शक्य तितक्या रुग्णालयांची बेडची व्यवस्था करून देतोय. मात्र वाढत्या रुग्ण संख्येमुळे यंत्रणा अपुरी पडत असल्याने सर्वांना बेड मिळणे शक्य नाही. त्यातून होणारी गरजू व गरिबांची तडफड पाहवत नव्हती. याच जाणिवेतून आपण काही लोकांचे प्राण वाचवू शकतो. यासाठी मी हे रुग्णालय सुरू करून लोकांच्या सेवेत समर्पित करीत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.