
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रुग्णसंख्येने आज एकाच दिवसात दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत तब्बल 10 हजार 860 रुग्णांची नोंद झाली असून 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईत डिसेंबरअखेरपासून तिसऱया लाटेचे संकेत मिळत असून दररोज 200 ते 300 पर्यंत येणारी रुग्णसंख्या आता दिवसाला हजारोंनी वाढू लागली आहे. यामध्ये 3 जानेवारी रोजी 8 हजारांत असणारी रुग्णसंख्या दोन हजारांनी वाढून थेट 10 हजार 860 इतकी नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या 49 हजार 661 चाचण्यांमधून ही रुग्णसंख्या आढळली आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही 47 हजार 476 वर गेली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये 9665 म्हणजेच 89 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. दरम्यान, आज 834 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 52 रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागली. पालिकेकडे सध्या उपलब्ध असलेल्या बेडपैकी 14.7 टक्के बेडवर रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. नव्या रुग्णांमुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 818462 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 16381 वर गेली आहे.
मुंबईचा कोरोना डॅशबोर्ड
सक्रिय रुग्ण 47476
रुग्ण बरे होण्याचा दर 92 टक्के
कोविड वाढीचा दर 0.63 टक्के
रुग्ण दुपटीचा कालावधी 110 दिवस

































































