प्रतीक्षा संपली, मुलांनाही कोरोना ‘सुरक्षा कवच’, आदित्य ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यभरात आज 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाल्याने मुलांनाही कोरोना ‘सुरक्षा कवच’ मिळाले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिकेच्या ‘बीकेसी’ जम्बो कोविड सेंटरमध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेत 28 दिवसांत मुंबईतील पात्र असलेल्या 9 लाख मुलांना पहिला डोस देण्यात येणार आहे, तर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर मोठय़ा प्रतीक्षेनंतर 16 जानेवारी रोजी 18 वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले. यात सद्यस्थितीत पालिका, खासगी आणि सरकारी अशा 450 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. या लसीकरणात आतापर्यंत 1 कोटी 80 लाख डोस देण्यात आले असून पहिला डोस 100 टक्के जणांनी तर दुसरा डोस 87 टक्के पात्र लाभार्थ्यांनी घेतला आहे. जानेवारीअखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुलांचे लसीकरण कधी सुरू होणार, असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र आता मुलांच्या लसीकरणाची प्रतीक्षा संपली आहे.

मुलांच्या लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, आमदार झिशान सिद्दिकी, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल, प्रभाग समिती अध्यक्षा प्रज्ञा भूतकर, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, शिक्षण सहआयुक्त अजित कुंभार, उपआयुक्त संजय कुऱहाडे, पराग मसूरकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, ‘बीकेसी’ सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे आदी मान्यवर उपस्थित होते.