
ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. एसी लोकलच्या दरात 50 टक्के कपात करण्यात आली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही घोषणा केली आहे.
मुंबईकरांसाठी लाइफलाइन असलेली लोकल अपग्रेड करत पश्चिम आणि मध्य रेल्वेने एसी लोकल सेवा सुरू केली होती. पण एसी लोकलचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रार प्रवाशांकडून वारंवार केली जात होती.
ऐन उन्हाळ्यात राज्यात उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे मुंबईकरही हैराण झाले आहेत. या मुंबईत रोजचा प्रवास सुखकर करणाऱ्या एसी लोकलचं तिकीट सामान्यांच्या आवाक्यात यावं यासाठी प्रयत्न सुरू होते. आता तिकीटदर कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
तिकीट दर जास्त असल्याने मुंबईकरांनी आतापर्यंत त्याला पुरेसा प्रतिसाद दिला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, पाच किमीच्या प्रवासासाठी आधी 65 रुपये दर होता तो आता 30 रुपये करण्यात येणार आहे. तिकीटाचा दर आधीप्रमाणेच किमीच्या हिशोबाने ठरवला जाईल.































































