घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी

मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याने 16 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला न्यायालयाने 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

घाटकोपर होर्डिंग कोसळल्यानंतर भावेश भिंडे हा फरार झाला होता. लोणावळा, कल्याण शिळफाटा, अहमदाबाद असा प्रवास करत त्याने उदयपूर गाठले. आणि उदयपूर येथील एका हॉटेलमध्ये लपून बसला. भिंडेला पकडण्यासाठी पोलिसांनी 7 पथके तयार केली होती. अखेर उदयपूर येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. भावेश भिंडेकडे दुर्घटनाग्रस्त होर्डिंगची जबाबदारी होतीच. पण त्याचबरोबर इतर 3 ते 4 होर्डिंगचीही जबाबदारी होती. प्रत्येक होर्डिंगचा खर्च तीन ते चार कोटी असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

Ghatkopar hoarding collapse : भावेश भिंडेला राजस्थानातून अटक

भावेश भिंडेकडे असलेल्या होर्डिंगची जबाबदारी आणि त्यांच्यावर होणारा खर्च पाहता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जसे की या प्रकरणात भावेशने होर्डिंगसाठी परवानग्या घेतल्या आहेत का? परवानग्या घेतल्या असतील तर त्यासाठी कोणाची मदत घेतली आहे? असे अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. या प्रश्नांसोबत आर्थिक व्यवहारही तपासणे गरजेचे असल्याचे सांगत पोलिसांनी न्यायालयाकडे भावेश भिंडेची कस्टडी मागितली. सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेता न्यायालयाने आरोपीला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनवाली आहे.