
दिवाळीनिमित्त उद्या 22 ऑक्टोबरपासून मुंबईतील महत्त्वाचे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, वाहतूक बेटांवर पालिकेकडून आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत ही रोषणाई करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पालिकेच्या वतीने ‘घरोघरी तिरंगा अभियान’ राबवताना संपूर्ण मुंबई महानगर तिरंगा विद्युत रोषणाईने झळाळून निघाले होते. त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आता दीपावलीसाठीही 22 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाचा आढावा अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी घेतला. या कामांसाठी प्रत्येक विभाग कार्यालयाला प्रासंगिक खर्च म्हणून निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे स्थळ दरपत्रिका मागवून तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही भिडे यांनी प्रशासनाला दिले.
मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा डॅशबोर्ड
मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या कामांसाठी पालिकेने वेगाने कार्यवाही सुरू केली आहे. सुमारे सतराशे कोटी रुपये खर्च करून ही कामे केली जाणार आहेत. यामधील 50 टक्के कामे डिसेंबरअखेरपर्यंत, तर मार्च 2023 पर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या कामांच्या पूर्ततेची संपूर्ण माहिती सर्वसामान्यांना मिळावी, प्रगतीचा आढावा घेता यावा यासाठी माहिती तंत्रज्ञान खात्याकडून डॅशबोर्ड सुरू करण्यात येणार आहे.



























































