मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्र्यांना सरकारी बंगले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चार मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला उद्धव ठाकरे यांना देण्यात आला  तर मंत्री छगन भुजबळ यांना ‘रामटेक’ बंगला वितरित करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘सागर’ बंगला देण्यास काँग्रेसने विरोध केल्याचे सांगण्यात येते.

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी मुख्यमंत्र्यांसह चार मंत्र्यांना सरकारी बंगले वितरित केले. मागील आठवडय़ात 28 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथविधीनंतर दोन दिवसांचे विशेष अधिवेशन होऊन सरकार स्थिरस्थावर झाले. त्यानंतर आता तीन मंत्र्यांना निवासस्थानाचे वाटप केले.

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानानंतर ‘रामटेक’ हा बंगला महत्त्वाचा मानला जातो. मंत्रिमंडळातील दुसऱया क्रमांकाच्या मंत्र्याचा मुक्काम शक्यतो ‘रामटेक’वर असतो. 1995 मध्ये युती सरकारच्या कार्यकाळात ‘रामटेक’ बंगला तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना मिळाला होता. त्यानंतर 1999 ते 2014 अशी सलग 15 वर्षे ‘रामटेक’ बंगला भुजबळांच्या ताब्यात होता. 2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे ‘रामटेक’वर वास्तव्याला होते.

या पार्श्वभूमीवर ‘रामटेक’ बंगला पुन्हा एकदा भुजबळ यांच्या वाटय़ाला आला आहे. उपमुख्यमंत्री आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून भुजबळ तब्बल 15 वर्षे आपल्या कुटुंबासह ‘रामटेक’वर राहत होते. राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री जयंत पाटील यांना मलबार हिल येथील ‘सेवासदन’ तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना ‘रॉयल स्टोन’ निवासस्थान आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई व डॉ. नितीन राऊत यांना अजून सरकारी बंगल्यांचे वाटप झालेले नाही.

देवेंद्र फडणवीस यांना ‘सागर’ वितरित

नवनियुक्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘सागर’ बंगला वितरित झाला आहे, मात्र काँग्रेसने यावर आक्षेप घेतल्याची चर्चा आहे. मंत्रालयासमोरील तत्कालीन विरोधी पक्षनेत्याचा ‘बी वन’ हा बंगला देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना ‘सागर’ बंगल्यावर वास्तव्य करण्यास मिळण्याची शक्यता कमी आहे असे सांगण्यात येते.

विधानसभा तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याला आतापर्यंत मंत्रालयासमोरील बंगला देण्यात आला आहे. मधुकरराव पिचड, नारायण राणे, रामदास कदम, एकनाथ खडसे, राधाकृष्ण विखे-पाटील, विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, विनोद तावडे, धनंजय मुंडे आदींना विरोधी पक्षनेते असताना मंत्रालयासमोरचा बंगला मिळाला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाही मंत्रालयासमोरीलच बंगला देण्याची काँग्रेसची मागणी असल्याचे सांगण्यात येते.