कोस्टल रोडचा दुसरा महाकाय बोगदा खोदण्यासाठी ‘मावळा’ सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला वेगवान बनवणाऱया कोस्टल रोडचा दुसरा महाकाय बोगदा खोदण्यासाठी ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशीनने कूच केली आहे. 11 जानेवारीला पहिला बोगदा खणून झाल्यानंतर 2300 टन वजनाची आणि चार मजल्यांइतकी उंची असणारी टनेल बोअरिंग मशीन 180 अंशामध्ये फिरवण्यात यश आले आहे. त्यामुळे दुसरा बोगदा खोदण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एप्रिलपासून दुसरा बोगदा खोदण्यास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती कोस्टल रोड प्रशासनाकडून देण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबईला वेगवान बनवणाऱया कोस्टल रोड प्रकल्पाचे सध्या निम्मे काम फत्ते झाले आहे. प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान 10.58 किमीचा रस्ता बनवण्यात येत आहे. कोस्टल रोडच्या कामाच्या पहिल्या टप्प्यात प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी 2.070 किमी लांब एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसरा बोगदा खोदण्यासाठी महाकाय मशीन फिरवणे मोठे आव्हान होते. मात्र कोस्टल कर्मचाऱयांनी हे आव्हान पेलत 180 अंशात मशीन फिरवली आहे. दरम्यान, कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू असून डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाकाय बोगद्याची वैशिष्टय़े

  • प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत 2.070 किमीचा बोगदा. एप्रिलपासून गिरगाव ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत खोदण्यात येईल. दोन्ही बोगद्यांमध्ये प्रत्येकी तीन लेन असतील. जमिनीखाली 10 ते 70 मीटरपर्यंत हा बोगदा खोदला जाईल.
  • बोगद्यांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी वायुविजनाची ‘सकार्डो यंत्रणा’ वापरली जाणार आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पालिका नियंत्रण कक्ष, पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाला तत्काळ मेसेज जाऊन मदत घेता येणार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.