तिसरी लाट नाही, पण दोन महिन्यांत अडीचपट रुग्णवाढ, दररोजची रुग्णनोंद 200 वरून 500च्या घरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आली नसल्याचे पालिका म्हणत असली तरी गेल्या दोन महिन्यांत निर्बंध शिथिल झाल्यानंतर दररोजची रुग्णनोंद सुमारे अडीच पटीने वाढली असून बाधितांचा आकडा 200 वरून 500 च्या घरात गेला आहे. रुग्णवाढीमुळे तीन हजार दिवसांवर गेलेला रुग्णदुपटीचा कालावधी झपाटय़ाने खाली आला असून 814 दिवसांनी घटला आहे.

मुंबईत कोरोना नियंत्रणात आल्यामुळे 15 ऑगस्टपासून राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले. यामध्ये लोकलसह सार्वजनिक ठिकाणची गर्दी वाढल्याने आणि नागरिकांकडून कोरोना निर्बंध पाळण्याकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णवाढ होत असल्याचे आरोग्य तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. 15 ऑगस्ट रोजी दिवसभरात केवळ 267 रुग्ण तर 4 मृत्यू नोंद झाले होते. यावेळी रुग्णवाढीची सरासरी 0.04 टक्के तर रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्के होता. यावेळी मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या फक्त 2834 होती. मात्र 15 ऑक्टोबर रोजी दिवसभरात तब्बल 488 रुग्ण आढळले असून 5 मृत्यू नोंदवले गेले आहेत. तर सक्रिय रुग्णांची संख्या 5379 वर पोहोचली आहे. यामध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्केच राहिला असला तरी रुग्णवाढीची सरासरी 0.06 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

खबरदारी घ्या! पालिकेचे आवाहन

निर्बंध शिथिलतेमुळे वाढलेली गर्दी रुग्णवाढीला निमंत्रण देत असल्याचा प्राथमिक अंदाज पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तिसरी लाट आलेली नाही हे सुदैव असले तरी कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना खबरदारी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. यामध्ये मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरचा वापर नियमित करावा, असेही पालिका प्रशासनाचे म्हटले आहे.

असा वाढतोय कोरोना

दिनांक रुग्णनोंद दुपटीचा कालावधी
15 ऑगस्ट 267 1921 दिवस
20 ऑगस्ट 322 2052 दिवस
25 ऑगस्ट 343 1884 दिवस
1 सप्टेंबर 416 1479 दिवस
5 सप्टेंबर 496 1363 दिवस
10 सप्टेंबर 441 1198 दिवस
15 सप्टेंबर 514 1277 दिवस
20 सप्टेंबर 419 1194 दिवस
25 सप्टेंबर 454 1195 दिवस
1 ऑक्टोबर 418 1159 दिवस
5 ऑक्टोबर 433 1154 दिवस
10 ऑक्टोबर 453 1057 दिवस
15 ऑक्टोबर 453 1057 दिवस