
मुंबईत सध्या दररोज एक लाख ते 80 हजारांपर्यंत लसीकरण केले जात आहे. जास्त प्रमाणात डोस मिळाल्यास दीड लाखांचाही टप्पा गाठला जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मिळणाऱया डोसमध्ये नोव्हेंबरअखेरपर्यंत सर्व मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज दिली. मुंबईत 18 वर्षांवरील एकूण 90 लाख जण लाभार्थी आहेत. त्यांना आतापर्यंत 76 लाख डोस देण्यात आले असून 19 लाख जणांनी दुसरा डोसही घेतला आहे.
पालिका, सरकारी आणि खासगी अशा 432 लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. 18 वर्षांवरील 90 लाख जणांना एकूण 1 कोटी 80 लाख डोसची गरज आहे. यातील आतापर्यंत मोठय़ा प्रमाणात लसीकरण करण्यात आल्यामुळे सध्याच्या वेगाने नोव्हेंबरअखेरपर्यंत सर्वांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी माहितीही पालिका आयुक्तांनी दिली. खासगी रुग्णालयांकडेही लाखो डोस उपलब्ध आहेत.
61 टक्के मुंबईकरांनी घेतला पहिला डोस
मुंबईतील सद्यस्थितीत पात्र 90 लाख नागरिकांपैकी 76 लाख डोस देण्यात आले आहेत. हे प्रमाण 61 टक्के आहे. तर 19 लाख जणांनी दुसरा डोसही घेतला आहे.
…म्हणूनच 14 दिवसांचे अंतर
कोरोनाच्या दुसऱया डोसनंतर 14 दिवसांनी माणसाच्या शरीरात कोरोना विषाणू प्रतिबंधक रोगप्रतिकारक्षमता निर्माण होते. त्यामुळे रेल्वे प्रवासाच्या अटीमध्येही दोन डोसनंतर 14 दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले आहे.

























































