Mumbai Crime – लघुशंकेचा बहाणा करत पोबारा केला, अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडला

अंधेरी परिसरातील डीएन नगर पोलीस स्टेशनच्या कोठडीतून फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला एक आरोपी लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांचा डोळा चुकवत पळून गेला होता. अखेर राजस्थानमधून त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट रोजी सकाळी आरोपी मोहम्मद कैफ इशर हुसेन हा लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने फरार झाला होता. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तातडीने हालचाल केली आणि डीएन नगर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना 932 किलोमीटर इतके अंतर पार करत राजस्थान गाठावे लागले. अखेर राजस्थानमधील कोटा येथून आरोपी मोहम्मद कैफ इशर हुसेन याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.