
जुन्या वादातून दोन कुटुंबांत भांडण होऊन चाकू आणि कोयत्याने एकमेकांवर हल्ला केल्याची घटना दहिसरच्या गणपत पाटील नगर येथे घडली. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. हमीद शेख, रामनवल गुप्ता आणि अरविंद गुप्ता अशी मृतांची नावे आहेत, तर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने गणपत पाटील नगर परिसरात तणावाचे वातावरण होते.
दहिसरच्या गणपत पाटील नगर येथे गुप्ता आणि शेख कुटुंबीय राहतात. गेल्या तीन वर्षांपासून त्या दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद सुरूच आहेत. आज सायंकाळच्या सुमारास गणपत पाटील नगर गल्ली नंबर 14 येथे रस्त्यावर राम गुप्ता याच्या नारळाच्या दुकानासमोर हमीद शेख हा दारू पिऊन आला तेव्हा त्यांच्यात वाद झाला. वाद झाल्यावर गुप्ता याने त्याची मुले अरविंद आणि अमितला बोलावून घेतले. त्यानंतर हमीदने त्याची मुले अरमान आणि हसनला बोलावले.
चाकू आणि कोयत्याने केलेल्या हल्ल्यात राम नवल गुप्ता आणि अरविंद गुप्ता हे मृत झाले, तर अमर गुप्ता, अमित गुप्ता हे जखमी झाले. त्याचप्रमाणे हमीद शेखचादेखील मृत्यू झाला असून त्याची दोन्ही मुले जखमी झाली आहेत.
शेख कुटुंबाच्या एका नातेवाईकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्या मृत्यूला गुप्ता कुटुंबीय जबाबदार असल्याचे धरून त्यावरून वाद सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेची माहिती समजताच परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार आदी पोलीस अधिकारी घटनास्थळी गेले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात पाठवले आहेत. रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.





























































