
मुंबई शहराचा सर्वांगीण विकास करताना त्यात महिलांसाठी विविध सुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाईल, असे पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सांगितले.
मुंबईमध्ये महिलांसाठी सुरक्षित वातावरण, नोकरदार महिलांसाठी हेल्पलाइन, भाडय़ाची घरे, चाळी आणि झोपडपट्टीमधील महिलांसाठी सुविधा, रोजगाराच्या संधी, महिलांसाठी शौचालये अशा विविध विषयांच्या संदर्भात मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शहराच्या विकास आराखडय़ात महिला सुलभ विकासाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार, उपायुक्त रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, अॅडव्हायझरी कमिटी फॉर जेंडरच्या नंदिता शहा, अमिता भिडे, प्राची मर्चंट, डब्ल्यूआरआयचे धवल आशर, तनुश्री व्यंकटरमण, आकांक्षा अग्रवाल, मणी मेहरोत्रा, रोहित लाहोटी उपस्थित होते. शहरातील वापरात नसलेल्या जागांचा विकास करणे, या ठिकाणी विविध लोकोपयोगी सुविधांची निर्मिती करण्याच्या अनुषंगानेही सादरीकरण करण्यात आले.
समृद्धी महामार्गावर सौर ऊर्जेस चालना
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबतही बैठक झाली. राज्याचा पर्यावरणपूरक विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सौर ऊर्जेचा वापर महत्त्वाचा असून समृद्धी महामार्गावर यासाठी चालना देण्यात येत आहे. बैठकीत या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक सूरज वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमईआरसीचे आंबेकर उपस्थित होते.


























































