लोकलमध्ये डिस्प्ले बोर्डचा वापर बॅग अडकविण्यासाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

मध्य रेल्वेच्या ठाण्याच्या पुढील प्रवाशांचे हाल दिवा येथील घटनेने पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. मध्य रेल्वेच्या लोकल गाडय़ांमध्ये इतकी गर्दी होत आहे की, प्रवाशांना स्वतःच्या बॅग ठेवण्यासाठीच्या ‘रॅक’ अपुऱया पडू लागल्या आहेत. त्यामुळे गर्दीत प्रवासी पॅसेंजर इन्फॉर्मेशन डिस्प्ले बोर्डाचा आधार चक्क आपल्या बॅग अडकविण्यासाठी करू लागले आहेत.

मध्य रेल्वेवर दिवसभरात 1772 फेऱया होत असूनही त्याही अपुऱया पडू लागल्या आहेत. एकटय़ा मध्य रेल्वेच्या प्रवाशांची संख्या 43 लाखांपर्यंत पोहचली आहे. ठाण्याच्या पुढे कर्जत-कसारा लोकल गाडय़ा खचाखच भरून जात असतात. प्रवाशांच्या पाठीवरील सॅकमुळे ट्रेनमध्ये आणखीन गर्दी होत आहे. शिवाय या बॅगांना दरवाजाच्या कडीत किंवा रॅक व स्टीलच्या जाळीला अडकविण्यासाठी वेगळे स्टीलचे स्पेशल हूक विकत मिळत आहेत.

गडय़ा आपल्या सिमेन्स लोकल बऱया
सिमेन्सच्या लोकलच्या दोन दरवाजांत असलेली जागा बम्बार्डिअर लोकलमध्ये कमी करण्यात आली आहे. या नव्या गाडय़ांत त्याऐवजी प्रवाशांना आतमध्ये बसण्यासाठी चांगली ऐसपैस पाय मोकळे करता येणारी जागा मिळाली आहे. मात्र या नव्या गाडय़ांमध्ये प्रवाशांच्या जवळील सामान ठेवण्याचे ‘रॅक’ अतिशय गुळगुळीत आणि काहीसे तिरके असल्याने त्यावरून बॅग घसरून डोक्यात पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अशा स्टीलच्या हूकचा वापर वाढला असल्याचे प्रवाशी बळीराम राणे यांनी सांगितले.