जागर-गैरसुविधांचे डोंबिवली स्थानक वय वर्षे 165!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dombivli

>>विकास काटदरे

डोंबिवली रेल्वे स्थानकाला म्हणता म्हणता 165 वर्षे पूर्ण झाली. मात्र इतक्या वर्षांनंतरही रेल्वे स्थानकाच्या सुविधा काही वाढत नाहीत. सर्वाधिक उत्पन्न देणारे, सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून डोंबिवली प्रसिद्ध असले तरी ‘सर्वाधिक गैरसुविधांचे रेल्वे स्थानक’ म्हणजे डोंबिवली रेल्वे स्थानक असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. डोंबिवली येथे सापडलेल्या शिलालेखावरून डोंबिवली शहराला 625 वर्षे झाली आहेत. 1887 पर्यंत या गावाचे नकाशापुरते अस्तित्व होते. मुंबई ते ठाणे आगगाडी 16 एप्रिल 1853 रोजी सुरू झाली. 11 महिन्यांनी म्हणजे 1 मे 1854 रोजी रेल्वेमार्ग कल्याणपर्यंत वाढवण्यात आला. या काळात डोंबिवलीला रेल्वे स्टेशन नसले तरी गाडय़ा थांबत असत. नंतर 33 वर्षांनी डोंबिवली रेल्वे स्थानकावर फलाट बांधण्यात आला. पूर्वी रेल्वे स्थानकावर शेड, फलाट नव्हते. गाडी थांबली की, शिडय़ा आणत. मग प्रवासी गाडीतून उतरत व चढत. मग पोर्टरने झेंडा दाखवल्यानंतर गाडी सुटत असे अशी आठवण जुने डोंबिवलीकर सांगतात.

डोंबिवली रेल्वे स्थानक झाल्यानंतर येथील लोकवस्ती वाढू लागली. मुंबईजवळचे स्वच्छ हवापाणी असणारे गाव म्हणून विशेषकरून पेन्शनर इथे येऊ लागले. कालांतराने गाडय़ांची संख्या वाढू लागली तशी लोकवस्ती वाढू लागली. चाकरमानी इकडे मुक्कामाला येऊ लागले. पुढे डोंबिवलीच्या पुढे कल्याण-बदलापूरपर्यंत वस्ती वाढल्याने गाडीला गर्दी होऊ लागली म्हणून ‘डोंबिवली लोकल’ सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला आणि 1994 साली डोंबिवली टर्मिनसचे उद्घाटन झाले व डोंबिवलीहून काही लोकल सोडण्यात येऊ लागल्या. आज अनेक ट्रेन डोंबिवलीहून सुटतात .मध्य रेल्वेने जी आकडेवारी दिली, त्यात डोंबिवली रेल्वे स्थानक तीनवेळा सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून घोषित झाले होते. रोज सुमारे तीन लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असतात. डोंबिवलीजवळ कल्याण दिशेला ठाकुर्ली व ठाणे दिशेला कोपर व दिवा- वसई मार्गावर अपर कोपर हे नवी रेल्वे स्थानके तयार करण्यात आली. वाढत्या गर्दीमुळे ही स्थानके फुलून गेली आहेत. या सर्वांचा ताण डोंबिवली रेल्वे स्थानकावर पडत असल्याने येथील नागरिकांचा ताण कमी होण्यापेक्षा तो वाढल्याचे दिसत आहे.

सर्वाधिक गर्दीचे, उत्पन्नाचे शहर असलेले डोंबिवली स्थानक सर्वाधिक गैरसुविधांचे स्थानक झाले आहे. कारण डोंबिवलीकर हे खूपच सोशिक आहेत. डोंबिवलीतून अनेक नागरिक पुणे-नाशिक भागात ये-जा करत असतात त्यांना ट्रेन पकडण्यासाठी कल्याणला जावे लागते. म्हणून या ट्रेनला डोंबिवलीत थांबा द्यावा अशी मागणी गेली अनेक वर्षे प्रवासी संघटना करत आहेत, पण डोंबिवलीकर सोशिक असल्याने या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या काही वर्षांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी डोंबिवली रेल्वे स्थानकावर अनेक सोयी करण्यात आल्या असल्या तरी अजून अनेक सुविधा होणे अत्यंत गरजेचे आहे.
सध्या डोंबिवलीमध्ये लोकल ट्रेनमध्ये प्रवेश करणे व उतरणे मोठे आव्हानाचे ठरत आहे. सर्वात जास्त प्रवासी संख्या असूनही डिलक्स प्रसाधनांची नितांत गरज आहे. विशेषतः महिला प्रवाशांची ही महत्त्वाची गरज आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकावर सध्या पाच फलाट असले तरी दोनच सरकते जिने आहेत व ते वारंवार बंद असतात. प्रत्येक फलाटावर सरकते जिने असणे आवश्यक आहे. तसेच फुट ओव्हर ब्रिज पण अपुरे असून त्यांची संख्याही वाढली पाहिजे. 15 डब्यांची लोकल सुरू असली तरी त्या खूपच कमी व गैरसोयीच्या वेळेत ठेवण्यात आल्याची प्रवाशांची तक्रार आहे याचाही प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे. सर्वात गरज आहे ती 5 आणि 6 क्रमांकाचा ट्रक सुरू होण्याची. सध्या या ट्रकचे काम दिव्यापर्यंत झाले असले तरी मुख्य भाग मुंब्रा व कळवा या ठिकाणचे काम रखडले आहे. या कामाची गती वाढणे गरजेचे आहे. हे दोन टॅक सुरू झाले की, लोकल ट्रेनचा वेग व फेऱया वाढणार आहेत. त्यानंतरच प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

आज डोंबिवली येथे लोकलमध्ये प्रवेश करण्याचे आव्हान डोंबिवलीकर पेलत असले तरी परिसरात मोठमोठी निवासी संकुले उभी राहत आहेत. त्यामुळे लोकवस्ती वेगाने वाढणार आहे हे नक्की. डोंबिवली रेल्वे स्थानकाला 165 वर्षे पूर्ण होत असताना नजीकच्या काळात या स्थानकावरील गैरसुविधा कमी होतील व डोंबिवलीकरांना सहजसुलभ प्रवास करता येईल अशी अपेक्षा आहे.