
मुंबईत सुनियोजित कचरा व्यवस्थापन करण्यासाठी पालिका ‘डॅशबोर्ड’ उपक्रम सुरू करणार आहे. यामुळे दिवसाला संपूर्ण मुंबईत निर्माण होणारा कचरा, वर्गीकरण-प्रक्रियेचे प्रमाण आणि दररोज घटणारा कचरा याची एकत्रित माहिती दर्शवली जाणार आहे. ज्यामुळे शहरातील कचरा कमी करण्यासाठी पालिकेला उपाययोजना करणे शक्य होणार असल्याचे उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी सांगितले.
मुंबईत कचऱ्य़ाचे सुयोग्य नियोजन करून शहर सुंदर बनवण्यासाठी पालिका अनेक उपाययोजना करीत आहे. याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत. दररोज 100 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्य़ा तसेच 20 हजार चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या संकुलांमध्ये ओल्या कचऱ्य़ावर प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात केले आहे. गेल्या वर्षीपर्यंत 3 हजार 125 संकुलांत अशी प्रक्रिया करण्यात येत होती, मात्र लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण कमी झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, नव्या डॅशबोर्ड उपक्रमामुळे कचऱ्य़ावर प्रक्रिया न करणाऱ्य़ा संकुलांवर आता नजर राहणार आहे. यामध्ये रोजच्या रोज कचऱ्य़ाचा हिशेब ठेवून प्रक्रिया न करणाऱ्य़ा संकुलांवर तत्काळ कारवाई करता येणार आहे.
अशी होतेय कार्यवाही
कचऱ्य़ाचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया होत नसेल तर संबंधित संकुलांना 10 ते 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड आणि न्यायालयीन कारवाई करण्याचीही तरतूद आहे. संपुलातील कचरा प्रक्रियेचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात येईल. कचरा निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरण, प्रक्रिया होऊ लागल्यावर डंपिंगवर येणारा कचरा कमी झाला आहे.


























































