शिडीला ‘लिफ्टची’ सुविधा!बचावकार्यासाठी 21 व्या मजल्यापर्यंत सहज जाता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱया मुंबई अग्निशमन दलात आता जर्मन बनावटीच्या दोन टर्नटेबल लॅडर्स (वाहनासह शिडी) दाखल झाल्या असून त्यामुळे बचावकार्यासाठी जवानांना 64 मीटरपर्यंत म्हणजेच 21 व्या मजल्यापर्यंत सहज मजल मारता येणार आहे. त्याचबरोबर एकाचवेळी 16 जणांची सुखरूप सुटका करता येणार आहे. शिडय़ांसाठी 21 कोटींचा खर्च आला आहे. त्यामुळे अग्निशमन दलाची क्षमता वाढली आहे. लवकरच या वाहनांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

हिंदुस्थानची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील जागा आता संपल्यामुळे आता उंच टॉवर्सच्या बांधकामांची मालिका सुरू झाली आहे. उंच इमारतींना आगी लागण्याच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे अग्निशमन दल अत्याधुनिक यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. यात डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली, आग विझवण्यासाठी रोबो तसेच 90 मीटरपर्यंत उंचीचे टर्न लॅडर म्हणजेच हायड्रोलिक प्लॅटफॉर्म, आरटीक्यूलेटेड वॉटर टॉवर हॅजमेट, अतिशीघ्र प्रतिसाद वाहने आणि श्वसन मास्क, जलद आग विझवण्याची प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक ऑटोमेटेड लॅडर्स वाहने आहेत. त्यासोबत आता नवीन टर्नटेबल लॅडर्स दाखल झाल्याने अत्याधुनिक वाहनांची संख्या वाढली आहे. ही वाहने चालविण्याचे प्रशिक्षण जवानांना देण्यात आले आहे.

शिडीची वैशिष्टय़े

n शिडय़ांमध्ये आधुनिक पद्धतीची लिफ्ट
n एका वेळेला अडकून पडलेल्या 16 जणांचा बचाव करणे शक्य
n या शिडीमध्ये स्ट्रेचर व व्हीलचेअर ठेवता येते
n शिडीचा क्रेन म्हणूनही वापर केला जाऊ शकतो
n शिडीचा वापर लाइट टॉवर म्हणून करता येतो
n अपुऱया प्रकाशाच्या ठिकाणी शिडीवरील एलईडी दिवे उपयुक्त

बचावकार्याचा वेग वाढणार

अग्निशमन दलात सध्या असलेल्या सुमारे 200 किलोचे लॅडर्स उचलण्यासाठी चार जवानांची आवश्यकता भासते. त्यामुळे दरवेळी लॅडर (शिडीची) हलवाहलव करणे अवघड जाते. नव्याने दाखल झालेल्या लॅडर वाहनामध्ये जवानांना वेगाने उंच मजल्यापर्यंत पोहोचणे आणि बचावकार्य करणे वेगवान होणार आहे. शिडीला असलेल्या लिफ्टच्या सुविधेमुळे हे शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा जीव वाचवणे शक्य होणार आहे.