गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! पाच दिवसांच्या बाप्पासह गौरींना निरोप

‘कोरोनाचे संकट लवकर दूर कर’, अशी बाप्पाचरणी प्रार्थना करत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात पाच दिवसांच्या गणपती आणि गौरींना आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. रात्री 10 वाजेपर्यंत 328 सार्वजनिक, 33,351 घरगुती आणि 3,760 गौराईं असे एकूण 37 हजार 439 गणपती, गौराईंचे विसर्जन करण्यात आले.

मुंबईत सुमारे 2 लाख घरगुती गणपती तर सुमारे 12 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव कोरोनाचे नियम पाळून साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात असून गर्दी टाळण्यासाठी पालिकेने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, घरगुती गणेशमूर्तींचे आगमन-विसर्जन मिरवणुकीच्या स्वरूपात करता येणार नाही. विसर्जनावेळी लसीकरणाचे 2 डोस घेतलेले असावेत, गणेशाची मूर्ती ही घरगुती उत्सवासाठी 2 फूट तर सार्वजनिक मंडळाच्या गणपतीसाठी 4 फुटांपेक्षा जास्त उंचीची नसावी, असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.

कृत्रिम तलाव सुविधेचा भाविकांनी घेतला लाभ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी यंदा 73 नैसर्गिक व 173 ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहेत. आखून दिलेल्या नियमांचे पालन करत मुंबईतील सार्वजनिक, घरगुती गणपतींसह गौरींचे विसर्जन झाले. मुंबईत रात्री 10 वाजेपर्यंत 328 सार्वजनिक, 33,351 घरगुती तर 3,760 गौरींचे विसर्जन करण्यात आले. यात कृत्रिम तलावांमध्ये 185 सार्वजनिक, 17 हजार 344 घरगुती आणि 2,015 गौरींचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, पालिकेने विसर्जनासाठी केलेल्या अत्यंत शिस्तबद्ध नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या