
सामना प्रतिनिधी। मुंबई
गुगल पे ऍप्स हॅक करून तरुणाच्या खात्यातून एक लाख रुपये परस्पर वळवल्याची घटना घडली. तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून साकीनाका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार तरुण हा साकीनाका परिसरात राहतो. त्याचे एका खासगी बँकेत खाते आहे. आठ महिन्यांपूर्वी तरुणाने खासगी वित्तपुरवठा करणाऱया संस्थेकडून हप्त्यावर स्मार्ट फोन घेतला होता. मोबाईलचे किती हप्ते अद्याप बाकी आहेत याकरिता त्याने मार्च महिन्यात वित्तपुरवठा करणाऱया प्रतिनिधींचा नंबर गुगलवरून मिळवला. त्या नंबरवर तक्रारदाराने फोन केला तेव्हा त्याला तुमचे जीएसटीसह विम्याचे पैसे कापले जात असल्याचे सांगितले. आम्ही तुमच्या मोबाईलचे हप्ते बंद करू, अशा भुलथापा मारल्या. विश्वास बसावा म्हणून तक्रारदाराची विचारपूस केली. विचारपूसदरम्यान ‘गुगल पे’ हे ऍप्स आहे का याबाबत चौकशी केली तेव्हा तरुणाने आपल्याकडे गुगल पे हे ऍप्स असल्याचे सांगितले. त्यानंतर सायबर भामटय़ाने तक्रारदारांना गुगल पेवरून रिक्वेस्ट पाठवली. तक्रारदारांनी ती रिक्वेस्ट स्वीकारली. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर सुरुवातीला त्याच्या बँक खात्यातून 20 हजार रुपये कपात झाले. त्यानंतर 25 हजार, 50 हजार आणि 5 हजार रुपये कपात झाले. पैसे कपात झाल्यावर तक्रारदाराने फोन करून त्या व्यक्तीला विचारणा केली तेव्हा तुमचे पैसे चुकीने कापले गेले असून ते परत मिळतील असे सांगण्यात आले. तक्रारदारांनी पुन्हा त्या नंबरवर फोन केला असता तो नंबर बंद होता. सायबर भामटय़ाने अकाऊंट हॅक करून एक लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूकप्रकरणी तक्रारदारांनी साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.





























































