
नऊ महिन्यांची मुदत देऊनही खटल्याची सुनावणी पूर्ण न करणाऱया अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयावर उच्च न्यायालय संतप्त झाले. दिलेल्या मुदतीत खटल्याची सुनावणी पूर्ण का नाही झाली याचा खुलासा करण्याचे आदेश हायकोर्टाने दंडाधिकारी न्यायालयाला दिले आहेत.
न्या. भारती डांगरे यांच्या एकल पीठाने हे आदेश दिले. दिलेल्या मुदतीत खटला पूर्ण होत नव्हता तर अतिरिक्त मुदतवाढीसाठी अर्ज करायचा होता. पण अर्ज करण्याची तसदीही दंडाधिकारी न्यायालयाने घेतली नाही, असे ताशेरे न्या. डांगरे यांनी ओढले.
या खटल्यात अवघे 15 साक्षीदार आहेत. गेली अनेक वर्षे हे प्रकरण प्रलंबित आहे. अजून हा खटला प्रलंबित राहिला तर त्या आधारावर आरोपी जामिनासाठी पात्र ठरेल. त्यामुळे हा खटला नऊ महिन्यांत पूर्ण करा, असे आदेश सप्टेंबर 2022मध्ये देण्यात आले होते. तरीही खटल्याची सुनावणी पूर्ण झाली नाही, अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली.
टी.आर. यादव असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. यादवने बॅंकेची पाच कोटींची फसवणूक केली, असा पोलिसांचा आरोप आहे.
























































