पवईच्या आयआयटी मुंबईने जिवंत केली दांडीयात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह करून ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला होता. या सत्याग्रहासाठी त्यांनी काढलेल्या दांडीयात्रेची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. पवई येथील आयआयटी, मुंबईने तो इतिहास जिवंत केला आहे. गांधीजींचा 15 फूट उंच ब्राँझचा पुतळा, दांडीयात्रेत सहभागी झालेल्या 81 लोकांचे पूर्णाकृती पुतळे आणि ती यात्रा डोळय़ासमोर उभी करणारी 24 भित्तीचित्रे आयआयटीच्या कार्यशाळेत साकारली गेली आहेत. गुजरातच्या दांडी येथील राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकात (एनएसएसएम) ती ठेवली जाणार आहेत.

आयआयटी मुंबईतील प्रा. जुसेर वासी आणि प्रा. कीर्ती त्रिवेदी आणि त्यांच्या टीमने ही सर्व कमाल केली आहे. प्रा. वासी यांनी या स्मारकासाठी सौरऊर्जा निर्मितीची गरज कशी पूर्ण करायची याची सर्व योजना बनवली, तर संपूर्ण डिझाइन्स प्रा. त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली बनवले गेले. राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक येत्या 30 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण केले जाणार आहे. 2005 मध्ये दांडीयात्रेला 75 वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधानांनी हे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती.

  • इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर – दांडी यात्रेकरूंची शिल्पे, 40 मीटर उंचीच्या खांबावरील काचेचा भव्य ठोकळा
  • इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग विभाग – स्मारकाला सौरऊर्जा पुरवण्यासाठी सोलार ट्री
  • सिव्हिल इंजिनीयरींग विभाग – कृत्रिम तलाव आणि त्याच्या आसपासची शिल्पकला
  • भौतिकशास्त्र विभाग – काचेच्या भव्य ठोकळय़ाची रोषणाई
  • मटेरियल सायन्स ऍन्ड मेटॅलर्जी विभाग – धुळीमुळे शिल्पे खराब होऊ नयेत म्हणून त्यावर कोटिंग लावणे
  • भूविज्ञान विभाग – स्मारकासाठी वापरलेले दगड, माती यांचा दर्जा आणि टिकाऊपणाची तपासणी

  • आयआयटी मुंबईतील विविध विभागांनी दांडी स्मारकासाठी विविध शिल्पे आणि वास्तू बनवण्यासाठी पुढीलप्रमाणे योगदान दिले आहे.
  • दांडी स्मारकाला वीज पुरवण्यासाठी 41 सोलार ट्री बनवण्यात आले आहेत. त्यापासून निर्मित वीज ग्रीडद्वारे स्मारकाला पुरवली जाणार आहे.
  • स्मारक पाहायला येणाऱ्या पर्यटकांना मीठ बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी मिठाच्या कोंडय़ा बनवण्यात आल्या आहेत. त्यासाठी आयआयटीने धारावीच्या कुंभारवाडय़ातील पारंपरिक कलाकार अब्बास गलावनी यांची मदत घेतली.
  • दांडीयात्रेचा इतिहास सांगणारी 24 भित्तीचित्रे हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. शांती स्वरुपिनी यांच्या मार्गदर्शनाखाली बनवली गेली.
  • स्मारकाची माहिती देणारे मोबाईल ऍपही बनवले गेले आहे.

मराठी शिल्पकाराने घडवला गांधी पुतळा

दांडी स्मारकासाठी महात्मा गांधी यांचा 15 फूट उंचीचा पुतळा शिल्पकार सदाशिव साठे यांनी घडवला आहे. हा पुतळा ब्राँझ धातूपासून बनवला गेला आहे. दांडी पदयात्रा 24 दिवस चालली होती. यात्रेकरूंनी 241 मैल इतके अंतर कापले होते.