जेईई ऍडव्हान्समध्ये चंद्रपूरचा कार्तिकेय देशात पहिला

सामना प्रतिनिधी। मुंबई

देशात प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱया जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेत यंदा महाराष्ट्राने बाजी मारली. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. महाराष्ट्राच्या कार्तिकेय चंद्रेश गुप्ता याने या परीक्षेत 100 पर्सेंटाइल मिळवून देशामध्ये पहिला क्रमांक पटकावला. कार्तिकेयने एकूण 372 गुणांपैकी 346 गुण मिळवले. तर शबनम सहाय ही 308 गुण मिळवून देशात मुलींमध्ये पहिली आली. मुंबईच्या तुलिप पांडे हिने देशात मुलींमध्ये तिसरा क्रमांक पटकावला.

देशातील 23 इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थांमधील विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा घेतली जाते. आयआयटी रुरकीच्या वतीने यंदा ही परीक्षा घेण्यात आली होती. 27 मे रोजी घेण्यात आली होती. 1 लाख 61 हजार 319 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यातील 38 हजार 705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये 5356 मुलींचा समावेश आहे.

कार्तिकेय हा मूळचा चंद्रपुरातील बल्लारपूर येथील असून प्रवेश प्रक्रियेच्या पूर्वतयारीसाठी मुंबईत निवासी हॉस्टेलमध्ये दोन वर्षे स्थायिक झाला. जेईई मेन परीक्षेमध्येही त्याने 100 पर्सेंटाइल मिळवून पहिल्या 20 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले होते.

या प्रवेश प्रक्रियेत यश मिळवण्यासाठी नियमित अभ्यास तर केलाच, पण मुंबई येथील ऍलन करीअर इन्स्टिटय़ूटमधील शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. मला मुळातच गणित-विज्ञान विषयांची आवड असल्यामुळे माझ्यासाठी अभ्यास सोपा झाला. स्मार्टफोनचा उपयोग अभ्यासासाठी निश्चितच होऊ शकतो, मात्र त्याचे व्यसन लागल्यास अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. असे कार्तिकेय गुप्ताने सांगितले आहे.

देशातील ‘टॉप 10’
कार्तिकेय गुप्ता (महाराष्ट्र), हिमांशू गौरव सिंह (दिल्ली), अर्चित बुबना (दिल्ली), गिलेला आकाश रेड्डी (हैदराबाद), बत्तीपती कार्तिकेयन (हैदराबाद), निशांत अभंगी (दिल्ली), कौस्तुभ दिघे (महाराष्ट्र), थिवेश चंद्र एम. (हैदराबाद), ध्रुवकुमार गुप्ता (दिल्ली), शबनम सहाय (महाराष्ट्र)