
रेल्वे रुळांच्या देखभाल दुरूस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी मध्य रेल्वेकडून मेन लाइनवर माटुंगा-मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टीदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर माटुंगा-मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱया डाऊन जलद मार्गावरील लोकल गाडय़ा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. तर ठाणे येथून अप जलद मार्गावरील सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत सुटणाऱया लोकल मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर चालवण्यात येणार असल्याने धीम्या मार्गावरील गाडय़ांना लेटमार्क लागणार आहे.
हार्बर मार्गावर सीएसएमसी-चुनाभट्टी आणि वांद्रे डाऊन मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत चुनाभट्टी आणि वांद्रे ते सीएसएमटी वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा होणार आहे. दरम्यान, ब्लॉक कालावधीत कुर्ला-पनवेलदरम्यान वीस मिनिटांच्या अंतराने विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.























































