मुंबईतील मराठी टीसीला उत्तर प्रदेश रेल्वे पोलिसांची मारहाण, प्रवाशाला विनातिकीट पकडल्याचा राग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकमान्य टिळक टर्मिनसहून लखनौला जाणाऱ्या मेल एक्स्प्रेसमध्ये मध्य रेल्वेत कार्यरत असलेल्या एका मराठी टीसीला उत्तर प्रदेशच्या रेल्वे पोलिसांनी बेदम मारहाण केली. एक्स्प्रेस ट्रेन उत्तर प्रदेशच्या हद्दीत असताना एका विनातिकीट प्रवाशाला तिकीट तपासनीस मिथिलेश पोद्दार यांनी पकडत तिकीट घेण्यास भाग पाडले. त्यामुळे गाडी उरई स्थानकात पोहोचताच उत्तर प्रदेशचे रेल्वे पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र सिंह यांच्यासह आठ-दहा पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण करत त्यांच्याकडील रोकड, गळय़ातील सोन्याची चेन पळवली. याबाबत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात होती.

मुंबई, ठाण्यातील उत्तर हिंदुस्थानींच्या प्रवासासाठी मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून अनेक एक्स्प्रेस गाडय़ा चालवल्या जातात. त्यानुसार 22121 ही गाडी 16 एप्रिल रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून लखनौसाठी जात होती. तेव्हा मिथिलेश पोद्दार हे गाडीत तिकीट तपासनीस म्हणून कार्यरत होते. गाडी उत्तर प्रदेशच्या झाशी लक्ष्मीबाई स्थानकात असताना एका प्रवाशाला विनातिकीट पकडत सुमारे 1,110 रुपयांचे तिकीट घेण्यास भाग पाडले. तसेच प्रवाशाला रीतसर त्याची पावतीही दिली, मात्र गाडी जेव्हा उरई स्थानकात आली, तेव्हा उपनिरीक्षक सुरेंद्र सिंह यांच्यासह इतर पोलिसांनी गाडीत चढून मिथिलेश यांना मारहाण केली. मुंबईला परत कसा जातो, रेल्वेची नोकरी कसा करतो तेच पाहतो अशी धमकीही दिली.

गाडी लखनौला पोहोचल्यानंतर मिथिलेश पोद्दार यांनी रुग्णालयात जाऊन तपासणी करून उपचार घेतले. यावेळी केलेल्या तपासणीत डोक्याला आणि डोळय़ाला दुखापत झाली आहे.