मुंबई मेट्रो-6 प्रकल्पाचा खर्च 441 कोटींनी वाढला, आरटीआयमधून माहिती उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम उपनगरातील स्वामी समर्थ नगर ते विक्रोळीदरम्यान बांधकाम केल्या जात असलेल्या मुंबई मेट्रो-6 प्रकल्पाचा खर्च तब्बल 441.79 कोटी रुपयांनी वाढल्याचे माहिती अधिकारातून (आरटीआय) उघडकीस आले आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण होऊन 1 एप्रिल 2021 पासून प्रवासी सेवा सुरू होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात प्रकल्पाची रखडपट्टी झाल्यामुळे खर्चात मोठी वाढ झाली.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई मेट्रो-6 प्रकल्पाचे काम आणि खर्चाबाबत माहिती अधिकारातून मागवलेल्या माहितीतून हा प्रकार समोर आला आहे. स्टेशन, सुपर स्ट्रक्चर, प्रवेश-निर्गमन रचना, जागेची उपलब्धता, तांत्रिक आवश्यकता आणि व्हायाडक्ट डिझाइनमध्ये बदल अशा विविध कारणांमुळे प्रकल्प खर्च वाढण्याचे मेट्रो प्रशासनाने म्हटले आहे. तसेच पालिकेकडून अतिरिक्त कामांची जबाबदारी देण्यात आली. यात जोगेश्वरी येथील मजास नाल्यावर दोन वाहन पुलांचे बांधकाम, आदर्श नगर ते जोगेश्वरी रस्त्यांची कामे तसेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड जंक्शन सुधारणा कामांचा समावेश आहे. प्रकल्पांतर्गत विविध कॉरिडॉरचे काम वेगवेगळ्या कंत्राटदारांना देण्यात आले. त्याचाही कामावर परिणाम झाला.

सुधारित खर्च 2126.74 कोटींवर

15.31 किमी लांबीच्या उन्नत मेट्रो-6 प्रकल्पांतर्गत स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी हा मार्ग विकसित करण्यात येत आहे. या मुख्य मार्गाच्या बांधकामाचे कंत्राट 2018 मध्ये देण्यात आले होते. प्रकल्पाची मूळ मंजूर किंमत 1684.95 कोटी रुपये होती. मात्र विविध बदल व अतिरिक्त कामांमुळे सुधारित खर्च 2126.74 कोटींच्या घरात गेला आहे.

नागरिकांचे पैसे जबाबदारीने वापरा!

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रकल्पातील वाढीव खर्च, विलंब आणि डिझाइन बदलांची सविस्तर माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांच्या पैशांचा पारदर्शक आणि जबाबदारीने वापर होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.