
वडाळा, भोईवाडा आणि दादर परिसरांना जोडणारे बेस्ट बस क्र. 61 व 200 या पूर्ववत सुरू करावेत आणि या भागातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ आणि स्थानिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने बेस्ट प्रशासनाकडे केली आहे.
वडाळा, भोईवाडा आणि दादर परिसरातील बस क्रमांक 61 व 200 मार्ग बंद केल्यामुळे या परिसरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व इतर प्रवाशांना पूर्वेहून पश्चिमेला येण्यासाठी दुसरी कोणतीच पर्यायी बस व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना रूपारेल कॉलेज, बालमोहन विद्यालय, अँटोनिया डिसिल्व्हा शाळा, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, हिंदुजा रुग्णालय या ठिकाणी येण्यासाठी मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे, अशा तक्रारी येथील रहिवाशांनी ग्राहक संरक्षण कक्षाकडे केल्या. याची तत्काळ दखल घेऊन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष व दक्षिण-मध्य मुंबई लोकसभेचे खासदार अनिल देसाई यांच्या निर्देशानुसार, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या शिष्टमंडळाने बेस्ट प्रशासनाचे नियोजन व्यवस्थापक प्रवीण शेट्टी यांची भेट घेतली. शिष्टमंडळात कक्षाचे सचिव निखिल सावंत, राजेश कुचिक, खजिनदार देविदास माडये, कक्ष कार्यालय चिटणीस, राजेश चव्हाण, दीपक कर्डिले, आकाश भिसे, लक्ष्मण माडये, विजय पवार, सतीश नाटेकर उपस्थित होते.