
गुरु तेग बहादूर नगर (जीटीबी) रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील निकृष्ट बांधकाम केलेला रस्ता महिनाभरातच उखडला. त्या बांधकामावरील कोट्यवधीचा खर्च पाण्यात गेला असतानाच पालिकेने रविवारी पुन्हा रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले. भरदिवसा रस्ता पूर्णतः बंद ठेवून दुरुस्तीकाम सुरू केल्यामुळे शीव-कोळीवाड्यात प्रचंड वाहतूककोंडी झाली. जीटीबी नगरहून कोळीवाडा, प्रतीक्षानगरला जाण्यासाठी दीड ते दोन किमीचा वळसा घालावा लागला. त्यामुळे वाहनधारकांचे हाल झाले.
जीटीबी रेल्वे स्थानक परिसरातून प्रतीक्षानगरकडे जाणाऱ्या एक किमी अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण गणेशोत्सवादरम्यान केले होते. त्या कामाला महिना उलटत नाही तोच रस्त्याची दुर्दशा झाली. रविवारी दुपारी पालिकेने नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता संबंधित रस्त्याचे पुन्हा दुरुस्तीकाम सुरू केले आणि रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवला. या रस्त्यावरून अनेक खासगी गाड्यांसह बेस्ट बसेसची ये-जा सुरू असते. रस्ता बंद केल्याने बेस्ट बस आणि खासगी गाड्यांच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला. वाहनधारकांना जीटीबी ब्रिजवरून प्रतीक्षानगरला जाण्यासाठी दीड ते दोन किमीचा वळसा घालावा लागला. त्यामुळे वाहनधारक, बेस्टचे प्रवासी, पादचारी व रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.
मनमानी कारभाराचा नागरिकांना मनस्ताप
जीटीबी नगर रेल्वे स्थानकावरून शीव, कोळीवाडा, प्रतीक्षानगरला जाणाऱ्या वाहनांसाठी एकमेव मार्ग असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने केले गेले. त्यामुळे अवघ्या महिनाभरातच रस्त्याची दुर्दशा झाली. त्यानंतर आता नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता भरदिवसा रस्त्याचे दुरुस्तीकाम सुरू केले. वास्तविक हे काम रात्री कमी वाहतुकीच्या काळात करणे आवश्यक होते. प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक नागरिक, वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शीव-कोळीवाडा विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार यांनी दिली.



























































