तो इंटरनेटवर आत्महत्या करण्याचे सोपे उपाय शोधत होता; मुंबई पोलिसांनी त्याला वेळीच रोखले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्ल्यातल्या किस्मत नगरात एक तरुण इंटरनेटवर आत्महत्या करण्याचे सोपे उपाय शोधत असल्याचे एसएनसीबी इंटरपोल वॉशिंग्टनकडून इंटरपोल नवी दिल्लीला सांगण्यात आले. तेथून मुंबई गुन्हे शाखेच्या इंटरपोल कक्षास याबाबत सांगण्यात आल्यानंतर युनिट-5च्या पथकाने तत्काळ त्या तरुणाचा शोध घेऊन त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले.

किस्मत नगरात एक तरुण इंटरनेटवर आत्महत्या करण्याचे सोपे उपाय याविषयी सर्च करून आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे तसेच त्याने यापूर्वी बऱ्याच वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती इंटरपोल नवी दिल्लीला मिळाल्यानंतर त्याबाबत मुंबई गुन्हे शाखेला अलर्ट करण्यात आले. त्यानंतर युनिट-5 ला ही माहिती देऊन त्या तरुणाला शोधण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले. त्यानुसार प्रभारी निरीक्षक घनश्याम नायर, निरीक्षक अजित गोंधळी व पोलीस पथकाने तांत्रिक बाबींचा अभ्यास करून नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या तरुणाला शोधून काढले. आयटी इंजिनीअर असलेला तो तरुण एका खासगी पंपनीत काम करीत आहे. त्याने शिक्षण व दैनंदिन गरजांकरिता वेगवेगळय़ा खासगी संस्थांकडून कर्ज घेतले असून कमी पगारात कर्जाचे हप्ते व घरखर्च भागवू शकत नसल्याने तो नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्या करण्याचा विचार करीत होता. तसेच त्याने यापूर्वी तीन ते चार वेळा प्रयत्नदेखील केला असल्याचे सांगितले. आता तो आत्महत्या करण्याकरिता सोपा उपाय संगणकावर शोधून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्याचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्याचे समुपदेशन करून त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.