मुंबई पोलिसांची महिला आघाडी पाईप बॅण्ड वाजवणार, महाराष्ट्रातले पहिले तर देशातले आठवे बॅण्ड पथक

<<< आशिष बनसोडे >>>

जागतिक पातळीवर आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. मुंबई पोलिसांची महिला आघाडी कठीण समजले जाणारे पाईप बॅण्ड वाजवणार आहे. लवकरच मुंबई पोलिसांचे स्वतःचे महिला पाईप बॅण्ड पथक अस्तित्वात येणार आहे.

कुठल्याच क्षेत्रात महिला मागे नाहीत. मुंबई पोलीस दलातदेखील महिला मोठ्या ताकदीने व सक्षमपणे कामकाज करत आहेत. म्हणूनच पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी आपल्या महिला आघाडीवर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलिसांचा पुरुषांचा स्वतः ब्रास बॅण्ड आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हेच बॅण्ड पथक कार्यरत आहे. पुरुषांचे आहे तर मग महिलांचे का नको, महिलांचेदेखील बॅण्ड पथक झाले पाहिजे ही संकल्पना आयुक्त देवेन भारती यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी वेळ न दवडता मुंबई पोलिसांचे महिला पाईप बॅण्ड पथक तयार करण्यास गेल्या मे महिन्यात अनुमती दिली. पाईप बॅण्ड वाजविणे तितके सोपे नाही. त्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त महिला असणे आवश्यक होते. त्यामुळे अनेक इच्छुक महिला पोलिसांचा फिटनेस पाहिल्यानंतर 47 महिला पोलिसांची या बॅण्ड पथकासाठी निवड करण्यात आली आणि जुलै महिन्यापासून हे बॅण्ड पथक सुरू झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

47 जणींची फौज है तयार

जुलै महिन्यापासून या 47 जणींच्या पथकाला सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रांमध्ये पाईप बॅण्ड वाजविण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात पहिले महिला पाईप बॅण्ड पथक होण्याचा बहुमान मुंबई पोलिसांच्या महिला पथकाला मिळणार आहे. तर देशात एकूण सात महिला बॅण्ड पथक असून या पंक्तीत मुंबई पोलिसांचे महिला पाईप बॅण्ड पथक आठव्या स्थानावर येणार आहे.

फिटनेसवर जोर…

महिला पाईप बॅण्ड पथक प्राथमिक स्तरावर आहे. आमच्या महिला शारीरिकदृष्ट्या स्वतःस फिट बनवत आहेत. अजून काही दिवसांनी महिला सुरात व लयबद्ध पाईप बॅण्ड वाजविण्यास शिकतील, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच पुरुष बॅण्ड पथकाप्रमाणे महिलांच्या पाईप बॅण्ड पथकालादेखील आकर्षक गणवेश असेल. त्याचे डिझाईन तयार करून मग ते पथकाला दिले जाईल. हे पथक एकदा परिपूर्ण तयार झाल्यानंतर ते विविध कार्यक्रम तसेच देशपातळीवरील पोलिसांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होईल, असेही ते अधिकारी म्हणाले.