मुंबईत पॉझिटिव्हीटी एक टक्क्याखाली, निर्बंध हटणार, मात्र मास्क राहणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत दररोज 40 ते 50 हजार चाचण्या होत असताना सुमारे 300 कोरोनाबाधित आढळत आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने सद्यस्थितीत एकही पंटेनमेंट झोन नाही. विशेष म्हणजे 1 फेब्रुवारीपासून बहुतांशी निर्बंध उठवल्यानंतर कोविड विषाणूचा ‘14 दिवसांचे सर्कल’ पूर्ण होत असतानाही रुग्णवाढ झालेली नाही. त्यामुळे तिसरी लाट पूर्ण नियंत्रणात आल्याचे स्पष्ट झाले असून आठवडाभरात सर्व निर्बंध उठवण्याबाबत ‘टास्क पर्ह्स’शी चर्चा करून निर्बंध हटवण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. मात्र ‘मास्क’बाबत अजून काही दिवसांनंतरच निर्णय होईल, असे ते म्हणाले.

मुंबईत 22 डिसेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली. त्यामुळे डिसेंबरच्या सुरुवातीला 200 ते 250 पर्यंत खाली आलेली रुग्णसंख्या थेट 20 हजारांपार गेली. त्यामुळे मुंबईचे टेन्शन वाढले होते. मात्र तिसऱया लाटेतील घातकपण कमी असलेल्या कोरोना व्हायरसमुळे महिनाभरातच रुग्णसंख्या नियंत्रणात आली. चाचण्यांच्या प्रमाणात बाधित आढळण्याचे प्रमाण 40 टक्क्यांवरून थेट एक टक्क्याच्या खाली आले आहे. शिवाय मृत्युदरही घटला आहे. परिणामी आठवडाभरात संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट, नाटय़गृहे, चित्रपटगृहे सध्या निम्म्या क्षमतेने सुरू आहेत.

धारावीत पुन्हा ‘झीरो पॉझिटिव्ह’

– सर्वाधिक वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रोनचा रुग्ण आशियातील सर्वात मोठय़ा आणि दाटीवाटीच्या धारावीतही आढळल्याने संपूर्ण मुंबईचे आव्हान वाढले होते. मात्र आता धारावीतही कोरोना पूर्ण नियंत्रणात आला आहे.

– धारावीत शनिवारी एकही कोरोनाबाधित आढळला नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. धारावीत आता केवळ 23 सक्रिय रुग्ण आहेत. धारावीत आतापर्यंत एकूण 8633 रुग्ण आढळले असून 8183 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
पात्र लाभार्थ्यांपैकी 100 टक्के जणांचा पहिला कोरोना प्रतिबंधक डोस झाला असून 95 टक्के जणांचा दुसरा डोसही झाला आहे. त्यामुळे तिसरी लाट थोपवण्यात लसीकरण सर्वात महत्त्वाचे ठरले असल्याचेही काकाणी यांनी सांगितले.
– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

मुंबईचा कोरोना डॅशबोर्ड

सक्रिय रुग्ण – 3219
लक्षणे नसलेले – 2771
लक्षणे असलेले – 198
रुग्ण दुपटीचा कालावधी – 1273 दिवस
रुग्ण बरे होण्याचा दर – 98 टक्के
रुग्णवाढीचा दर – 0.07 टक्के