
भाऊचा धक्का ते मांडवा अशी ‘एम 2 एम -1’ रो-पॅक्स फेरी सर्व्हीस बोटीची सेवा रविवारपासून सुरू करण्यात आली असतानाच सोमवारी जूनपासून मुंबईच्या उपनगरात बेलापूर, वाशी, ऐरोली आणि ठाण्यातून सुरक्षित आणि वेगवान अशी हॉवरक्रॉफ्ट सेवा सुरू करण्यात येणार आहे.
भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) अशा मार्गावर रविवारपासून आलिशान ‘रो -पॅक्स’ फेरी बोटीची सफर सुरू करण्यात आली आहे. यानंतर आता नवी मुंबईला मुंबईशी जोडण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून हॉवरक्राफ्ट सेवा सुरू करण्यात येणार आहे. वाशीच्या खाडीत मोठय़ा प्रमाणात गाळ असल्याने खास हॉवरक्रॉफ्ट सेवेसाठी चाचपणी केली जात आहे. त्यासाठी खास 25 ते 32 प्रवाशांची क्षमता असणाऱया खास हॉवरक्राफ्टची पाहणी करण्यासाठी आमचे शिष्टमंडळ रशियाला जाऊन आल्याचे केंद्रीय नौकानयन मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले.
कोरोनाचे संकट आले अन्यथा एप्रिलमध्येच हॉवरक्राफ्टसेवेचा प्रारंभ करण्यात येणार होता. आता जूननंतर ही सेवा बहाल करण्यात येणार असल्याचे मांडवीय यांनी सांगितले. हॉवरक्राफ्ट सेवेसाठी गाळ उपसण्याची गरज लागणार नाही. बेलापूरला हॉवरक्राफ्टची जेटी तयार आहे. वाशीला जेटी आहे.नेरूळची जेटी तयार झाली की ऐरोलीची तयार करायची आहे. आणि चौथी जेटी ठाण्याच्या मीठबंदरला तयार करायची आहे. त्यानंतर ठाणे, नवी मुंबई आणि भाऊचा धक्का अशी हॉवरक्राफ्ट सेवा चालू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱयाने दिली.
मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत नेरूळला ‘रो -पॅक्स’ सेवेसाठी जेटी बांधून झाली की प्रथम नवी मुंबई ते भाऊचा धक्का येथील डोमेस्टीक क्रुझ टर्मिनल अशी कॅटामरीन सेवा चालू करण्यात येणार आहे. सध्या गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा (अलिबाग) जलमार्गावर कॅटामरीन बोटीची सेवा सुरू आहे. त्यानंतर या मार्गावर ‘रो-पॅक्स’ सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱयाने सांगितले.
हॉवरक्राफ्टला धक्के जाणवत नाहीत
याआधी आणलेल्या हॉवरक्राफ्ट मुंबईत अपयशी ठरल्या होत्या. त्या लाटांवर आपटत असल्याने आत बसलेल्या प्रवाशांना धक्के बसत होते. या नव्या हॉवरक्राफ्ट कितीही लाटा उंच असल्या तरी त्याच्या खास ‘कुशन’मुळे हे धक्के शोषले जाऊन प्रवाशांना कोणताही धक्का जाणवत नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.



























































