आरटीई प्रवेश कधी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदीनुसार खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी शाळा नोंदणीची मुदत संपली तरी प्रवेशाला अद्याप सुरुवात झालेली नाही.

प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत राज्यभरात आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या प्रवेशासाठी राज्यभरात ऑनलाइन प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शाळांना प्रवेशाच्या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक असून मुंबईवगळता बहुसंख्य जिह्यातील शाळांनी अद्याप नोंदणीच केली नसल्याचे समोरे आले आहे. शाळा नोंदणीची मुदत 17 फेब्रुवारीला संपली होती.

आरटीईच्या प्रवेशासाठी नोंदणी करण्यासाठी शाळांना अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर ज्या शाळांची काही तांत्रिक कारणामुळे नोंदणी शिल्लक आहे, अशा शाळांना मागील दोन दिवसांपर्यंत आपली नोंदणी व्हावी म्हणून विशेष सवलत देण्यात आली होती. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाने नुकताच एक आढावा घेतला असता मुंबईचा अपवाद वगळता राज्यातील अनेक शाळांनी आपली नोंदणी केली नाही. यामध्ये राज्यात मुंबई महापालिका शिक्षण विभागाने आघाडी घेतली असून आतापर्यंत 360 हून अधिक शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे.