सलमानच्या घरात सापडल्या डेंग्यूच्या अळय़ा, कीटकनाशक विभागाची मुंबईभर शोधमोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड स्टार सलमान खानला डेंग्यू झाल्याच्या बातमीनंतर पालिकेच्या शोधमोहिमेत त्याचा वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या अडगळीत डेंग्यूच्या अळय़ा सापडल्या आहेत. यानंतर पालिकेने संबंधित डासांची डेंग्यू उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली आहेत.

मागील आठवडय़ात सलमान खानला डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून सलमानच्या वांद्रे येथील घराचा परिसर तपासण्यात आला. यामध्ये अपार्टमेंटच्या अडगळीत डेंग्यू पसरविणाऱ्या एडिस इजिप्ती या डासांच्या अळय़ाची पैदास आढळून आली. या डासांची पैदास प्रामुख्याने स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात होते. त्यामुळे सलमान राहत असलेल्या संपूर्ण इमारताची तपासणी पालिकेने केली. यामध्ये दोन ठिकाणी एडिस इजिप्ती डासांच्या अळय़ा आढळून आल्या.

308 ठिकाणी झाडाझडती

पालिकेच्या कीटकनाशक विभागाने सलमान राहत असलेल्या परिसरातील 308 घराची झाडाझडती घेतली. यामध्ये 323 कंटेनर तपासण्यात आले. त्यामध्ये दोन ठिकाणी डेंग्यूच्या अळय़ा आढळून आल्या. डेंग्यूच्या अळय़ांची उत्पत्ती होऊ शकणाऱ्या 27 ठिकाणे यावेळी नष्ट करण्यात आली.