कोरोना हद्दपार होतोय! सलग दुसऱ्या आठवडय़ात पाच हजारांवर सक्रिय रुग्ण घटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या चांगलीच आटोक्यात आली असून सलग दुसऱया आठवडय़ात पाच हजारांवर सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. 26 जून रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 727 इतकी होती. 4 जुलै रोजी हा आकडा 9 हजार 710 वर तर 11 जुलै रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 5 हजार 595 ने कमी होऊन 4 हजार 115 वर आली आहे.

मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर एप्रिलअखेर पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली होती. मे महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा पार केल्याने पालिका आणि राज्य सरकारचेही टेन्शन वाढले होते, मात्र जूनमध्ये रुग्णसंख्येला पुन्हा एकदा उतरती लागली असून रुग्णसंख्या पाचशेहून कमी नोंद होत आहे. विशेष म्हणजे दररोज दहा हजारांहून जास्त चाचण्या होत असताना बाधितांची संख्या घटत आहे. मुंबईत 18 वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यामुळे कोरोना पूर्ण आटोक्यात आला असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे, मात्र यामुळे मुंबईसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

मुंबईचा कोरोना डॅशबोर्ड

आतापर्यंतचे सक्रिय रुग्ण – 11,18,396
कोरोनावर मात केलेल्यांची संख्या – 10,94,657
कोरोनामुळे झालेले मृत्यू – 19,624
सद्यस्थितीमधील सक्रिय – 4,115
लक्षणे असलेले बाधित – 1,010
लक्षणे नसलेले बाधित – 3,086

अशी स्थिती सुधारली

जुलैच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 581 दिवस होता. यामध्ये सुधारणा होऊन 11 जुलै रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी 710 दिवसांनी वाढला आहे.

गेल्या संपूर्ण आठवडय़ात 4926 कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 2410 वरून 1010 वर आली आहे. क्रिटिकल रुग्णांची संख्या 18 वरून 12 झाली आहे.

मुंबईत सलग तिसऱया दिवशी एकही मृत्यू नाही; मुंबईत, राज्यात कोरोनाला उतरती कळा

गेल्या काही दिवसांत मुंबई आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत असून मुंबईत आज 235 तर राज्यात 1 हजार 189 कोरोना रुग्ण सापडले. मुंबईत सलग तिसऱया दिवशी एकही म्त्यू झाला नाही तर राज्यात दोघा रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईत आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत असून गेल्या दीड महिन्यांतील हा निचांकी आकडा आहे. 235पैकी 204 जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर 31 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 8 जणांना ऑक्सिजन बेडची गरज लागली. दिवसभरात 431 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 557 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात 1 हजार 529 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 27वर पोहोचली आहे.