बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘26/11’ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना बुधवारी मरीन ड्राइव्ह येथे श्रद्धांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्यपालांसह मुख्यमंत्री तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि शहीदांचे कुटुंबीय उपस्थित होते.

मरीन लाइन्स येथील पोलीस जिमखान्यात ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद अधिकारी व जवानांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाला अभिवादन करीत शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे तसेच पोलीस दलातील अधिकारी आणि शहीदांचे कुटुंबीय उपस्थित होते. 11 वर्षांपूर्वी झालेल्या ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अपर पोलीस आयुक्त अशोक कामटे, पोलीस निरीक्षक विजय साळसकर, शशांक शिंदे, मेजर उन्नीकृष्णन, सहाय्यक फौजदार तुकाराम ओंबळे हे अधिकारी शहीद झाले होते तसेच 166 नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला होता. शिवाय 300 हून नागरिक जखमी झाले होते.

‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथे मंगळवारी खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह बच्चन कुटुंबीय उपस्थित होते.