
सामना प्रतिनिधी ।मुंबई
अनाथ मुलांना शिक्षण आणि नोकर्यांमध्ये खुल्या प्रवर्गातून 1 टक्का समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे. गेल्या 17 जानेवारी 2018 रोजी तसा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र मुंबई विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेमध्ये अनाथांना हे आरक्षण डावलले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
मुंबई विद्यापीठाने नव्या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियांसाठी मंगळवारी परिपत्रक जारी केले. त्या परिपत्रकानुसार जातीय व समांतर आरक्षण देण्यात आले आहे. परंतु अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून 1 टक्का समांतर आरक्षण दिले असल्याचा उल्लेख परिपत्रकात नाही. हा अनाथ मुलांवर अन्याय असून त्याचा जाब विचारण्यासाठी कुलगुरूंना घेराव घालण्याचा इशारा प्रहार विद्यार्थी संघटनेने दिला आहे. मुंबई विद्यापीठाने या परिपत्रकात दुरुस्ती करावी आणि अनाथ मुलांना आरक्षण देणारे नवे परिपत्रक जारी होत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष ऍड. मनोज टेकाडे यांनी केली आहे.



























































