प्लॅस्टिकविरोधी कारवाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापराविरोधात नगर महापालिकेकडून कठोर कारवाई सुरू आहे. मंगळवारी कापडबाजार परिसरात मनपाच्या पथकाने छापे टाकले. त्यावेळी दोन दुकानदारांनी कर्मचार्‍यांशी अरेरावी करत त्यांना मारहाण केली. तसेच दंड भरण्यास नकार देत कर्मचार्‍यांना दुकानातून हुसकावून लावल्याची घटना घडली. या प्रकरणी मनपा प्रशासनाने संबंधित व्यापार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार शहरात महापालिकेच्या पथकांकडून तपासणी सुरू आहे. बंदी असलेले प्लॅस्टिक बाळगणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मागील आठवडाभरात सुमारे अडीच लाखांहून अधिक दंड मनपाने वसूल केलेला आहे. मंगळवारीही स्वच्छता निरीक्षकांच्या पथकांकडून शहरातील कापडबाजार, भिंगारवाला चौक परिसरातील दुकानांची तपासणी करण्यात आली. यावेळी मोटवाणी सारीज व मँगो किड्स या दोन दुकानांमधून प्लॅस्टिकचा माल जप्त करण्यात आला. मनपाच्या पथकाने कारवाई केल्यानंतर तेथील व्यापार्‍यांनी पथकातील कर्मचार्‍यांना अरेरावी करत दंड भरण्यास नकार दिला. ‘तुम्हाला जे करायचे ते करा, आम्ही दंड भरणार नाही’, असे सांगत त्यांनी कर्मचार्‍यांना दुकानातून हुसकावून लावले.

स्वच्छता निरीक्षकांनी प्लॅस्टिकचा माल जप्त करुन पंचनामा केला आहे. या घटनेबाबत कर्मचार्‍यांनी वरीष्ठांना कळवले असून त्याबाबतचा लेखी अहवालही घनकचरा व्यवस्थापनच्या विभाग प्रमुखांकडे सादर करण्यात येणार आहे. मनपाच्या पथकाला हुसकावून लावत कारवाईला अटकाव करण्यात आल्यामुळे व व्यापार्‍यांकडून आक्रमक भूमिका घेतली जात असल्याने कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. या संदर्भात प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाईबाबत काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही व्यापार्‍यांनी मनपाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधून कर्मचारीच अरेरावी करत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.