पालिका कर्मचाऱ्यांना आता कॉर्पोरेट ओळखपत्र; क्यूआर कोडचाही समावेश, पालिका करणार सुमारे सात कोटी खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह 24 विभाग कार्यालयांचे रुपडे बदलले असताना आता आता पालिकेत कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱयांना क्यूआर कोडचा समावेश असलेले कॉर्पोरेट ओळखपत्र दिले जाणार आहे. यासाठी पालिका प्रशासन सुमारे 6 कोटी 83 लाख रुपये खर्च करणार आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेची जगभरात ओळख. करदात्या मुंबईकरांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणाऱया मुंबई महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱयांची प्रतिमा उंचावणे यासाठी प्रयत्नशील असते. खासगी कंपनीत काम करणाऱया अधिकारी-कर्मचाऱयांचे ओळखपत्र बघताच बडय़ा कॉर्पोरेट कंपनीत काम करतो, हे स्पष्ट होते. मुंबई महापालिकेत सध्या एक लाख दोन हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत तर सेवानिवृत्त कर्मचाऱयांचीही संख्या मोठी आहे. महापालिकेच्या सध्याच्या ओळखपत्रात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त सध्या कार्यरत अधिकारी व कर्मचाऱयांना नवीन ओळखपत्र देण्यास पालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

निर्मिती, वितरणासाठी स्वतंत्र कंत्राट

एकदा सर्वांना नवीन ओळखपत्रे दिल्यानंतरदेखील नवनियुक्ती / बदली/सुधारणा/चोरी/गहाळ होणे या विविध कारणांमुळे दर महिन्याला काही ओळखपत्रे पुन्हा नव्याने देणे आवश्यक असते. अशा प्रकारे बृहन्मुंबई महापालिकेच्या कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱयांसाठी पहिल्यांदा अंदाजे 2 लाख 8 हजार नवीन ओळखपत्राची निर्मिती, वितरण करण्याचे कंत्राट देण्यात येणार आहे.