
विधवा, घटस्फोटीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुंबई महापालिकेने मदतीचा हात पुढे केला असून अशा महिलांना स्वयंरोजगार करता यावा, यासाठी घरघंटी, शिलाई मशीन, वाती यंत्र खरेदीसाठी त्यांना आर्थिक मदत करणार आहे. महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत पात्र महिलांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्यासाठी 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवले आहेत.
पालिकेच्या महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत पहिले प्राधान्य विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत, 40 वर्षांवरील अविवाहित महिला, गिरणी कामगार, देवदासी, दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्रधारक, महिलांना देण्यात येणार असून त्यानंतर सर्वसाधारण महिला आणि कोरोनाने पती गमावलेल्या महिलांना देण्यात येणार आहे. या योजनेकरिता केशरी शिधापत्रिकाधारक महिलांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्रतेचे निकष, योजनेच्या अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे व अर्जाचा नमुना पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण माहिती व अर्जाचा नमुना विभाग कार्यालयाच्या स्तरावरील समाज विकास अधिकारी (नियोजन) यांच्याकडे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.




























































