
मुंबईत वाढलेले प्रदूषण रोखण्यासाठी आता प्रत्येक प्रकल्पात 20 टक्के हरित प्रकल्प राबवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यासाठी खासगी, सरकारी बांधकामांसह पालिकेच्या सर्व विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रकल्पांना याच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात येतील. शिवाय प्रत्येक प्रकल्पामुळे तयार होणारे प्रदूषण रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून प्रदूषणाच्या पातळीवर नजर ठेवून उपाययोजना केल्या जाणार आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी ‘ग्रीन बजेट’ संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून देण्यात आली.
वाहनांमुळे होणारे प्रदूषण, सागरी पर्यावरण, पारंपरिक ऊर्जेतून निर्माण होणारे प्रदूषण यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘हरित संकल्प’ योजना राबविण्यात येत आहे. यासाठी तज्ञांच्या मदतीने पालिका अभ्यास करणार आहे. भविष्यात राबवल्या जाणाऱया प्रकल्पात 20 टक्के हरित प्रकल्पात झाडांची लागवड, मियावाकी वननिर्मिती याबरोबर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करणे, इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे अशी कामे केली जाणार आहेत.
म्हणूनच घेतला निर्णय
– कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर विविध परिषदेत पावले उचलली जात आहेत. मुंबईत याची अंमलबजावणी करण्यासाठी सन 2022 मध्ये मुंबई हवामान कृती आराखडा बनवण्यात आला आहे.
– राज्य सरकार आणि पालिकेकडून या आराखडय़ावर काम केले जात आहे. पुढील टप्प्यात पालिकेकडून या आराखडय़ांतर्गत हरित संकल्प प्रकल्प पालिकेकडून राबविला जाणार आहे.



























































